नक्कीच खूप रात्र झालीये. रात्र काय पहाट व्हायची वेळ होत आली. मी आपला बसलेलाच… कोणीतरी बसवून ठेवल्यासारखा. माणस केंव्हाच झोपली. सकाळी उठून सगळ्यांनाच आपापले व्याप आहेत. प्रत्येकानेच पुढच्या दिवसाच्या महत्त्वाच्या कामांची योजना ठरवून रात्री लवकर झोपण्याचा निर्णय घेतला न त्यांची निम्मी अधिक झोप झाली सुद्धा. पण मी आपला अजून बसलेलाच. तासाभरापूर्वी झोपायला जायचा विचार आला, ठरलं…आता जायचं झोपायला. तरी मात्र मी आपला कुठल्यातरी प्रश्नाच उत्तर शोधत असल्यासारखा अजून बसून आहे, वाटत आता उत्तर सापडेल, मग उत्तर सापडेल, मग जाऊ झोपायला, जवळच आलोय, थांब अजून थोड, अन माझ्या सोबतीला आहेच ही नीरव शांतता, अगदी नीरव. आजूबाजूला कोणाची गडबडीत असल्यासारखी अन जीवनाचा अर्थ उमगून आता फक्त त्यावर आचरायच राहिलय अशी हालचाल नाही…
लांब समोरच्या खिडकीमध्ये असाच कोणी माणूस माझ्यासारखा जागा असलेला दिसतोय, असेल बापडा अश्याच माझ्यासारख्या कोणत्यातरी न कळलेल्या विवंचनेत. त्याची सोबत आहे मला. अशी प्रश्न पडलेल्या अन विवंचनेत असलेल्या माणसांची सोबत मला जास्त आवडते….
रात्री का जाणे मला आकाश खूप मोठ दिसत. कदाचित दिवसा मुंगीएवढ्या पण नसलेल्या माणसांनी आकाशाएवढे आणलेले आव माझ लक्ष तिकडे वेधून घेत असतील. पण हा माझाच दोष. कारण दिवसाही आकाश तेवढंच मोठ आहे न माणस तेवढीच मुंगीपेक्षा लहान. पण रात्री या विशाल आकाशाने माझ्यात निर्माण केलेला खुजेपणाचा भाव मला शांत करतो एवढं नक्की. जगातल्या सगळ्या खुज्या गोष्टींशी एकरूप करतो. काय खुज आणि काय विशाल? सगळच खुज आणि सगळच विशाल. वाटतय ही रात्र कधी संपूच नये. रात्र म्हणजे सगळ्या निरर्थक हालचालींची शांतता आणि निसर्गाच्या गूढ संवादाकडे टवकारलेले माझे कान एवढच मला जाणवतय…
माझ्या जवळच्या माणसांनी शंभर वेळा सांगून झालय “रात्री जागरण करू नको, तब्येत बिघडेल”. पण जोपर्यंत ही निसर्गाची साद दिवसा माझे कान भरून टाकत नाही तोपर्यंत हे जागरण अनिवार्य. दोष माझाच आहे…….