……. लोकांचे समुह तयार झाले. निसर्गामद्धे अनुभवास येणार्या गोष्टी हीच आदिमानवाची प्रेरणा. हसताना, रडताना ऐकू येणारा ध्वनि, कोकिळेचा सुमधुर स्वर, पानांचा सळसळणारा आवाज, पाण्याचा खळखळणारा आवाज, लहान मुलांचा अवखळ आवाज असे अनेक आवाज कानावर पडत असताना निसर्गामद्धे त्याला स्वतःच्या अभिव्यक्तीला भाषा सापडली हे नक्की. एखाद्याला भावलेला किंवा त्याच्या अंतरंगातील भाव त्याला एखाद्या ध्वनित सापडला असणार. ताल आणि विविध त्याला सुसंगत असे आवाज हेच सुरूवातीचे संगीत. सुरुवातीचा मनुष्याचा काळ हा त्याच्या व्यक्तीगत पेक्षा सामूहिक घडामोडींचा काळ आहे. समुदाय छोटे त्यामुळे विचारांची सुसंगती अन एकी जास्त. स्वतच्या अस्तित्वासाठी समुदायाच्या गरजेची भावना प्रबळ. त्यामुळे एकी, जबाबदारी, गरज, आणि स्वतः ही समुदायामुळेच अस्तीत्वात असणारी व्यक्ति आहे याची जाण त्याकाळी असणे स्वाभाविक होते. स्वतःमुळे समुदाय अन समुदायामुळेच स्वतः. जी समुदायची ही भावना आपण सध्या हरवत चाललोय ती त्या काळात आदिमानवमध्ये प्रबळ असणार. त्यामुळेच सुरूवातीचे संगीत हे पण मोठ्या प्रमाणात समुदायिकच असणार. यातूनच निर्माण झाले ते म्हणजे लोक संगीत. लोकांनी एकत्र जमावे आणि मुख्यत्वेकरून तालावर आधारीत असे सर्वांना भावेल, पोहोचेल असे संगीत अभिव्यक्त करणे अशी त्यकाळातली परिस्थितीनुरूप विकसित झालेली व्यवस्था असणार. यातून एकीचा भाव वृंढीगात होतो. सामुदायिक जीवनासाठी अन समुदायाच्या विकाससाठी अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे याच्या जाणिवेतून विकसित झालेली ही पद्धती होती.
…………….आता बराच काळ गेला. लोकांनी समुदाय करून राहायला सुरुवात केल्यापसून बराच काळ लोटला आहे. या काळात भाषा विकास पावली आहे. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी लोकमान्य संकेत आणि लोकांपर्यंत पोहोचणारी भाषा लोकांमधला दुरावा दूर करण्यास करणीभूत होत आहे. व्यक्त होण्याच्या प्रबळ इछेतून आणि समुदायाच्या एकीच्या बळातूनच “भाषा” या गोष्टीचा विकास झाला. आता भाषेमुळे लोकांना एकत्र भावेल, एकत्र कळेल, एकत्र पोहोचेल अशा संगीताचा परीघ वाढत गेला. पूर्वी ज्यामधे फक्त तालाचे प्रमाण अधिक होते अशा संगीतात आता भाषेमुळे, वाक्यांचा, शब्दांचा, छोट्या छोट्या तालाधिष्ठित यमक असलेल्या कव्यांचा विकास झाला आणि अभिव्यक्ती अजून प्रबळ झाली. अंतर्मनातील जटिल आणि व्यक्तीगत गोष्टी व्यक्त करायचं प्रयत्न होऊ लागला. हा सर्व विकास फक्त आणि फक्त व्यक्त होण्याच्या प्रबळ इछेतून झाला. याचा परिणाम लोक संगीत अधिक अधिक विकसित होण्यामध्ये झाला. या काळापर्यन्त माझ्या मते सर्वात प्रबळ अभिव्यक्ती संगीतच असणार कारण ही सामुदायिक अभिव्यक्ती होती.
……………. असाच बराच काळ लोटला. आता टोळ्या, टोळ्यांचा समुदाय, आणि आता समुदायाचा समाज होण्याच्या विकासपर्यंत माणूस येऊन पोचला आहे. सामुदायिक जीवनामुळे सोप्या झालेल्या अस्तित्वाच्या लढाईत माणसाचा विजय झालेला आहे. परिणत लोकसंख्या वृद्धीहि झालेली आहे, होत आहे. आता मात्र सुरक्षिततेमुळे माणसाच्या सामुदायिक, सामाजिक जाणिवा थोड्या ढील्या पडल्या. समुदायाकडून “स्व” कडे जाण्याचा प्रवास चालू झाला. बुद्धिमत्ताही खाजगी होऊ लागली. खाजगी मालमत्तेत वाढ झाली. मोठय्या समाजामध्ये छोट्या छोट्या टोळ्या तयार झाल्या. कुटुंब व्यवस्थेचा विकास झाला. आणि आता मात्र लोककलांसारख्या सामुदायिक कलांमध्ये वेगळा बदल होऊ लागला. कलासुद्धा व्यक्तीगत होऊ लागली. व्यक्तीगत कला म्हणजे काय? तर ती कला जी लोकमान्य भाषा आणि संकेतांच्या पलीकडे, स्वतःचा भाव व्यक्त करण्यासाठी, व्यक्तीगत संकेत आणि भाषेचा उपयोग करू लागली. ती कला ज्यामधे फक्त सामुदायिक एकी आणि सामाजिक प्रतिबिंब याच्या पलीकडे व्यक्तीगत भावांचेच प्रतिबिंब दिसू लागले. ज्याला आपण सध्या “abstract” म्हणतो अशा कलांचा विकास झाला. कलेमधील जटीलतेचा विकास झाला. छोट्या छोट्या गटांमध्ये या कलांचा विकास होऊ लागला. ज्याला जी कला पोहोचली, कळली, तो त्या गटात सामील होऊ लागला आणि विकासासाठी आणि व्यक्त होण्यासाठी त्यामध्ये आपला हातभार लावू लागला.
……..असाच आणि थोडा काल लोटल्यावर, ज्या त्या गटामद्धे प्रचारकी भाव वाढू लागला. जो तो गट आपल्या कलेचा विकास करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रचार करू लागला. जास्तीत जास्त लोकांमध्ये त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न होऊ लागला. या प्रक्रियेत देवाण घेवाणीला सुद्धा चालना मिळाली.एकमेकांचे एकमेकांवर प्रभाव पडू लागले. या प्रक्रियेत कलांचा प्रचंड विकास झाला. यामध्ये ज्या कलांचा सापेक्षा विजय झाला, ज्या कलांना लोकमान्यता मिळाली त्यांचे शास्त्र विकसित झाले. जसा जसा विकास वाढत होत तस तसा तो सामावून घेण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांना हस्तांतरित करण्यासाठी शास्त्रांचा विकास अनिवार्य होता. त्या त्या कलांना त्या त्या वर्णाचे (स्वभावानुसार) समर्थक लाभले. आणि त्या वर्णाच्या लोकांमध्ये त्यांच्या स्वभावानुसारच त्या कलांचा विकास झाला. कलांनाच जणू स्वभाव प्राप्त झाला. उदाहरणार्थ ज्यांचा स्वत्वाचा शोध घेण्याचा ध्यास होता त्यांच्या कला जास्तीत जास्त व्यक्तीगत स्वरुपाच्या (individualistic) बनत गेल्या. त्यांचे शास्त्र जास्तीत जास्त जटिल होत गेले. त्या कला सर्वसामान्य जनतेपासून दुरावत गेल्या. याचे एक उत्तम उदारहरण म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत. याला कितीही जटिल शास्त्र असले तरी हे संगीत मूलतः व्यक्तीगत (individualistic) अभिव्यक्तीसाठीच आहे हे आपल्याला जाणवते. आणि तश्याच स्वभावाच्या लोकांचा ओढा या संगीताकडे जास्त असल्याचे सुद्धा आपण पाहतो. इतक्या वर्षांच्या अखंड विकासानंतर या कलेने गाठलेली गूढ खोलीच या स्वभावाच्या लोकांना आकर्षित करते. याविरुद्ध प्रचारकी दिशेने विकसित झालेल्या कलांचा विकास हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने झाला त्यामुळे त्याला सामुदायिक (social) स्वरूप लाभले. यामध्ये व्यक्तीगत (individualistic) अभिव्यक्तीबरोबरच सामाजिक अभिव्यक्ती आणि प्रतिबिंब पण दिसून येऊ लागले. पण व्यक्तीगत अभिव्यक्तिमद्धे, व्यक्तीगत (individualistic) कलांएवढी खोली यांना गाठता आली नाही.
आणि असाच या कलांचा विकास पुढे इथपर्यंत होत आला आहे…….
या प्रवासामध्ये प्रातींनिधिक कला म्हणून मी संगीताचे उदाहरण घेतले आहे कारण माझ्या मते वर सांगितल्याप्रमाणेच संगीत ही मानवाची प्राचीन व प्रबळ अभिव्यक्ती आहे. यामध्ये ढोबळमानाने कलेचा विकास मी मला वाटतो तसा मांडला तो माझ्या मते सर्व संस्कृतींना कमी जास्त प्रमाणात लागू पडतो. कारण या अशा विकासाचे मुळ हे माणसाच्या मूल स्वभावामद्धे आणि प्रवृतींमध्ये आहे. वेगवेगळ्या संस्कृती, त्यांच्या वेगवेगळ्या जीवनपद्धती आणि त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या विकसित झालेल्या कला आणि दिशा यामध्ये वेगळेपणाचे कारण भौगोलिक आणि ऐतिहासिक आहे. माणूस हा सगळ्या पृथ्वीवर समानच आहे आणि हा ढोबळ प्रवास मी त्या मूल मानवी प्रवृत्तींच्या आणि स्वभावाच्या आधारे केला आहे. त्यामुळे माझ्या मते हा सर्व संस्कृतींना लागू होतो. कला ही माझ्या मते अत्युच्च अभिव्यक्ती आहे. आणि त्याच्या विकासाचा अभ्यास आपल्याला कितीतरी प्रश्नांची, सामाजिक मनाची आणि परिणामतः व्यक्तीगत मनाची ओळख करून देऊ शकतो. एखादा ई. स. पूर्व ४०० मधील सामान्य व्यक्ति आणि त्याची अभिव्यक्ती आणि माझी अभिव्यक्ती यामधील समान धागा आणि त्याला करणीभूत होणारा घटक यांच्या शोधासाठी केलेला हा प्रयत्न आहे, जो चालूच राहील…..
sundar….