कचरा

“माझ्या अस्तित्वाच मूळ कुठे सपडेल? माझ्या पिळवटलेल्या हृदयचा उपचार कुठे सापडेल? मला कोणताही फार मोठा दिव्य प्रश्न पडलेला नाही हे नेहमी जाणवत राहत. प्रश्न साधाच आहे, विवंचना साधीच आहे, आजार साधाच आहे युगानुयुगे लोकांना पडत आलेला. अस्तित्वासाठी चाललेल्या झगड्याचा, सुरक्षिततेचा, मला हव्या असलेल्या आदराचा. माझ्या आजूबाजूला बरीच निरागस मंडळी आहे. खरच निरागस ! त्यांच्या अस्तित्वातून वाहणारा निरागसतेचा झरा माला काळवंडून टाकतो. माझ्यामधील या काळ्या झगड्याबद्दल मला शिव्या देत राहतो. स्वतःच्या या सर्वसामान्य झगड्याला उदात्त आवरण चढवण्याचा माझा प्रयत्न मला काळवंडून टाकतो. मला स्वतःला या झगड्याला त्या स्वरुपात बघायचे आहे. पण सत्य जे आहे ते स्वीकारले पाहीजे. माझा काळवंडलेपणा हा भीतीतून उत्पन्न झालेला आहे. असुरक्षिततेतून उत्पन्न झालेला आहे. स्वतःमधल्या असामर्थ्याचा राग लोकांवर का काढावा? मला माझ्या अस्तित्वाचे मुळ हुडकायचे आहे. मला माझ्या अवस्थेला स्वतः म्हणून स्वीकारायचे आहे. मी म्हणजे स्वतःवर चढवलेला वेगवेगळया विचारांचा, उदात्त हेतुंचा मुलामा नव्हे हे अनुभवायचे आहे. मी काळ्या दागडातली मूर्ति आहे त्यावर चढवलेले रंग नव्हे. स्वीकृतीमध्येच शांतता आहे.
अडखळणारे मन जेंव्हा रस्ता दगडा धोंड्यांनी भरलेला आहे हे स्वीकारेल तेंव्हाच प्रवास सुखकर होईल. आयुष्य म्हणजे सरळ रेष नाही. ते वेटोळयांनी भरलेले आहे. त्या वेटोळ्यांना बघून स्वीकारणे आणि एकरूप होणे हाच मार्ग आहे. वेटोळ्यांना सरळ करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. स्वतःमधील निरागसता झर्‍याप्रमाणे वाहू दिली पाहिजे. आणि स्वतःला त्यामध्ये डोळे बंद करून झोकून दीले पाहिजे. कधी कधी वाटते गोष्टी तात्विक स्वरूपामध्ये समजणे घातकच आहे. कारण ते समजण्याचा तसा काहीच उपयोग नसतो. ते समजणे म्हणजे आपण विनाकारण स्वतःला कोठेतरी ओढत नेण्याचा प्रकार असतो. आपण स्वतःला ओढू शकत नाही हे समजण्यामधेच हुशारी आहे. स्वतःला ओढण्यामध्ये जी शक्ति खर्च होते त्याला गणनाच नाही.
जेंव्हा डोळ्यांवर झापड येते, पहिला पाऊस हृदयामध्ये काहीच हालचाल निर्माण करत नाही, दूर डोंगरावर उतरलेला ढगाचा पुंजका स्वतःला विसरायला लावत नाही तेंव्हा समजावे आपल्या असुरक्षितातेच्या भावनेचा बांध फुटलेला आहे. सौंदर्यदृष्टी हरवणे, बधिरपणा येणे ही त्याचीच लक्षणे.
मी खरच कोण आहे? मी सौंदर्यदृष्टी आहे. मी आनंद आहे. मी काळजी आहे. मी विचारी आहे. मी असुरक्षितता आहे. मी त्रागा आहे. मी अपेक्षा आहे. मी दुःख आहे. मी झरा आहे. मी समुद्र आहे. पण या सर्वांचा मिळून बनलेला आहे? नाही. मी एका वेळी एकच गोष्ट आहे. एका वेळी एकच ! मी जेंव्हा असुरक्षितता आहे तेंव्हा मी सौंदर्यदृष्टी नाही किंवा दुःख ही नाही. या माझ्या अस्तित्वांचा एकमेकापासून एकमेकाकडेचा प्रवास इतका सूक्ष्म आहे की मी स्वतःस एकाच वेळी सर्व समजू लागतो. त्यामुळे मी कोणत्या क्षणी कोण आहे ते पाहून, जाणवून त्याशी एकनिष्ठा राहणे जास्त श्रेयस्कर आहे.”
वर्तमान क्षणाच्या पाठीवर स्वार होऊन येणारे हे चिंतन. वर्तमानातील प्रत्यक्ष अस्तित्वाशी प्रतारणा करणारे हे चिंतन. वर्तमान क्षण सत्य आहे. क्षण ‘आहे’. ‘मी’ (क्षणामद्धे) ‘आहे’. क्षणाच्या पुढे क्षणाच्या मागे, सर्व ‘विचारांचा कचरा’ !

Advertisement

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s