कोणीतरी आत्ता धाव घेऊन येईल अस का वाटत राहत कळत नाही. सश्याच काळीज म्हणजे काय कळतय. बसलोय आत्ता ऑफिस मध्ये. बाकीची माणस पण आहेत, एक माणूस असाच खिश्यात हात घालून इकडे तिकडे भटकतोय. एवढा एक सोडला तर बाकी शांतता आणि वातावरण अस की वाटावं जगात कुठे काम होत असेल आणि माणस स्वतःला झोकून देत असतील तर ते इथेच. हे अस रोज करायच, उठायच, इथे यायच आणि या ढोंगी शांतातेमध्ये मिसळून जायच. सश्याच काळीज आहेच बरोबर बांधून ठेवायला. डोक्याला जडत्व आलय याचा अंदाज पण येत नाही. मी सकाळी उठतो ते संध्याकाळचे 6 कधी वाजतात याची वाट बघतो. मला काम कारयला आवडत नाही म्हणून मी करत नाही की मला करताच येत नाही हे पण मला या धुक्यामद्धे कळत नाही. हा एक माझा खेळ चांगला चालू असतो..”माला करता येत का नाही” ! डोक्याला ताप आहे…
मधला एक तास कोणीतरी आल, काम करायच जोरदार नाटक झाल. तेवढीच मनाला शांतता मिळाली. अशी नाटक जेंव्हा यशस्वीरीत्या पार पडतात तेंव्हाचा आनंद हाच एकमेव आनंद. वाटत, चला आता पुढचे 2 तास तरी कोणी आपल्याला वाकड्या नजरेने पाहणार नाही. तेवढ्यात हे लिहून घेऊ, मग परत दुसर नाटक हुडकायच. स्पष्ट सांगायच झाल्यास मला करकुनी काम आवडतात. कारण ते नाटक सोप असत. दिसायला काम पण दिसत. फार डोक्याला त्रास द्यावा लागत नाही. कोणतही तस बर्यापैकी स्टेटसच करकुनी काम आल की मी लगेच उचलतो. चला संध्याकाळचे साडे 6 झाले. उठाव…
उठलो आणि आता आलो रूमवर. आता इथून पासूनचा पुढचा वेळ माझा. आंघोळ करताना वाटत तरी राहत की आता बरच चांगलं काही करेन. मग बसल्या बसल्या आठवत च्याआईला आता थोड्या वेळात झोपेची वेळ होणार. एकदा झोपल्यार मग सरळ सकाळ. बोंबलायला वाटत राहत हा मनहुस भविष्यकाळ माझ्या मागेच लागलाय. अन बरोबरीने याच्याएवढा मनहुस विचार नाही हा विचार पण डोक्यात येतो. घ्या आता ! म्हणजे रडत राहण्याचा रोग लागलाय याच्यापेक्षा वेगळा निष्कर्ष माझ्याच्याने निघत नाही. अश्या मानसिक अवस्थेत असल्यावर स्वतःवर हसता पण येत नाही. म्हणजे वाटत खर तर हे हास्यास्पद आहे. पण हसू येत नाही. लांब उभे राहून जर मी स्वतःकडे पाहिले तर माझा पडलेला रडका चेहरा आणि sad body language मला दिसेल असा माझा अंदाज आहे. जगतानाची समरसता मला हसू आणत नाही पण लिहिताना मात्र चेहर्यावर खरच हसू उमटतय.
बस्स…हा निरर्थक बडबडीचा खटाटोप कशासाठी? वाटत बडबडल तर कदाचित अडकलेला बोळा निघेल. मार्ग मोकळा होईल. पाणी वाहत होईल. शेवटी छाताडात जडत्व अनुभवत रडक तोंड घेऊन फिरण्यापेक्षा हे परवडल. माझ्या अनुभवांचा हा विरोधाभास जर असाच लिहून माझ्यात बदल होणार असता तर खरच सोप होत. पण माझ्या डोसक्यावरचा एक कचरा संस्कार माला कोपर्यातून आत्ता हे पण विचारतोय की “का बाबा बदल कश्यासाठी? बदलाच्या मागे लागलास तर न संपणार्या चक्रात अडकशील, बदलाला स्पष्ट रूप नाही आणि अस्तित्वही नाही. त्यामुळे या बदलाच्या इच्छेला काही अर्थ नाही.” मग आता माझा या माझ्या अस्तित्वशून्य अतिशहाण्या कचरा संस्करला माझा प्रश्न आहे “ का बाबा उगाच उपटलास? तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाला ‘निरर्थक योग्य विचार’ यापेक्षा वेगळं काय अस्तित्व आहे? तुझ ऐकून तस वागायचा प्रयत्न करणे हा तुझ्याच उपदेशाचा विरोधाभास नाही का?” माझ्या मेंदूचे बरेच कप्पे असल्या निरर्थक संवादांनी भरले आहेत. या संवादांमध्ये जेवढी ऊर्जा नष्ट होते तेवढी कशात नाही. जेवढी विरोधाभासी बडबड आणि घर्षण मला माझ्या डोक्यात सापडते तेवढी माझ्या स्वतःसाठी मला दुसरीकडे कोठेही सापडणार नाही. आता विचार आला की ‘चल आता काहीतरी बर लिहून हे संपवाव’. पण बाबा काहीतरी बर लिहिणं हाच या निरर्थक बडबडीचा विरोधाभास नाही का? मग आता गप्प बस्स आणि म्हण “संपलं” !