रुद्रवीणा …आलापिची नाजूकता ,कोमलता,भयाणता,सखोलता काय वर्णावी! आवाज असा की गंभीर आर्त साद. त्याच्या प्रत्येक तारेच्या झंकारा बरोबर येणारा तो मधुर आणि अनंतापर्यंत सखोल जाउ शकणाऱ्या आवाजाला मी पूर्णपणे माझ्या ऐकण्यातून न्याय देउ शकत नसल्याची खंत नेहमी राहते. असं वाटत राहत की हा काहीतरी असं सांगून गेला जे तो सांगत असताना आपले कान दुसरीकडेच लागले होते. कितीही ध्यान देउन ऐकलं तरीही कमीच वाटेल अशी सखोलता. प्रत्येक स्वर काहीतरी सांगतोय हे जाणवत राहत. अस्तित्वाच्या मुळापासून येणारा धीर गंभीर साद रुद्रवीणे मध्ये आहे. जणू विश्वाच्या मुळाशी असलेल्या नियंत्याचा श्वास. भवताली फक्त अलंकारिक सौंदर्य नाहीये…..फक्त अलंकार म्हणजे सौंदर्य नव्हे…..फक्त सौम्यताच कानाला गोड लागते हा चुकीचा समज आहे….फक्त गार वाऱ्याची झुळूकच आत्म्याला शांती देउन जात नाही. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याची ताकद, समुद्राच्या अस्तित्वाचा पसारा, हिमालयामध्ये घुमणारा रुद्र हुंकार या रौद्र गोष्टी आत्म्याला कोठेतरी खेचून नेतात,जे
नक्कीच मुळाशी असलेल्या त्या रौद्रतेशी एकरूप करतात. रुद्रवीणा ही अशी प्रवास घडवते. रुद्र करते…. वीणा ही शास्त्रिय संगीतातील अतिप्राचीन वाद्यांपैकी एक. रुद्रवीणा ही त्याचाच एक गंभीर आवाज. शांततेत झंकारणारी, हुंकारणारी रुद्रवीणा म्हणजे रौद्रामध्ये मनुष्यास सापडलेल्या सौंदर्याची अभिव्यक्ती. जेव्हा रौद्रामध्ये भयापलीकडील सौंदर्य दिसते तेव्हा आपले अस्तित्वासाठी धडपडणारे मन व विचारक्षमता पवित्र हिमपर्वतांमध्ये रात्री चंद्रप्रकाशात भयापलीकडे जाउन अगम्य विवंचनेत भटकू लागले याची खात्री बाळगावी! या रुद्र विवंचने पुढे मी नतमस्तक!