जंगल . त्या जंगलातील एक पडकी वास्तू. कोणीही तिकडे कित्येक वर्षात फिरकलेले नाही हे स्पष्ट समजतंय. एके काळी त्या वास्तुमध्ये माणसाच्या वास्तव्याने प्राण फुंकले असतील. पण आता? आता जंगलाच्या त्या वेड्यावाकड्या अस्तित्वात ती वास्तू मिसळून गेल्याच , एकरूप झाल्याच स्पष्ट समजतंय. या जंगलातील काळी कभिन्न रात्र म्हणजे तर साक्षात निर्जीवातेचा भास. इथे फक्त वटवागुलांचा वावर असतो. त्या वास्तूच्या एकलेपणाच्या त्या अस्तित्वामध्ये औदासिन्य भरलेले आहे. मानवी चैतन्याच्या स्पर्शाशिवाय त्या वास्तूला स्वताची ओळख नही. आणि आता त्या वास्तुपासून दूरवर गेलेली मानवी वस्ती आता त्या वास्तूकडे परत फिरकण्याची शक्यताही नही. प्रत्येक संध्याकाळ आणि प्रत्येक रात्र भयाण. त्या खांबावर पानाफुलांचे नक्षीकाम स्पष्ट दिसत आहे. मानवी आकृत्या, त्यांचे वेगवेगळे भाव, आजूबाजूच्या निसर्गाने मानवी मनावर उठवलेल निरनिराळे तरंग आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्पष्ट दिसत आहेत. त्या वास्तुवरील नक्षीकाम, त्या वास्तुवरील चैतन्याच्या खुणा, मानवी स्पर्शाची एक अन् एक खुण वास्तूच्या भयाणतेमध्ये भर घालतीये. जणू एखादे निर्जीव शरीर. वास्तूच्या रुपाने जन्माला आलेल्या सुंदर अभिव्यक्तीस दाद द्यावी का तिच्या आत्ताच्या उदास अवस्थेची कीव करावी कळत नाही. आजूबाजूच्या विळख्यात जखडलेल्या त्या अस्तित्वाला सकाळच्या प्रसन्न सूर्य किरणाचा स्पर्श होण्याची सुतराम शक्यता नाही. अब्जावधी वर्षांचा काळोख. आता त्या वास्तूला नाव नाही. ओळख नाही. प्रयोजन नाही. आता फक्त राहायचे. असायचे. पुढची अब्जावधी वर्षे जोपर्यंत चैतन्याच्या खुणा पुसल्या जात नाहीत तोपर्यंत फक्त उदास अस्तित्व बनून राहायचे. त्या पुसल्या गेल्या की मग काळोखातील औदासिन्यहि संपेल आणि भयाणताही !
वास्तू
Posted on by eklachalo
Published by eklachalo
I have few things in my mind....This is an effort to try n express those things properly n boldly through words....want to explore the power of expression ! View all posts by eklachalo